
औरंगाबाद ः सर, आम्ही दोन दिवसांपासून उपाशी आहोत... घरातलं सगळं सामान संपलंय... मागच्या दीड महिन्यांपासून कामधंदा नसल्यामुळे उपासमार होत आहे... रस्त्याने येणारे जाणारे काहीतरी खायला देतील या आशेने दररोज रस्त्याच्या कडेला जाऊन बसतो. तेव्हा कोणीतरी भाजीपोळी देते, त्यावर सध्या आम्ही दिवस काढत आहोत.
सर, आमच्या मुलाला शिक्षण नको; पण काही खायला असेल तर देता का? मुकुंदवाडी येथील गणपतराव जगताप शाळेतील विद्यार्थी अन् काही पालकांनी केलेल्या मागणीमुळे गणपतराव जगताप शाळेचे संस्थापक सचिव आबासाहेब जगताप यांच्या डोळ्यातून अलगद पाण्याच्या धारा वाहू लागल्या.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे शाळेतर्फे ऑनलाइन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करण्यासंदर्भात शाळेचे सचिव आबासाहेब जगताप व मुख्याध्यापक राकेश गांगुर्डे सर्व विद्यार्थ्यांना फोन करत होते. याबाबत सांगताना सहारा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आबासाहेब जगताप म्हणाले, की खरं, तर आम्ही ऑनलाइन शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना फोन करत होतो. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी सांगितले, की सर आमच्या घरात घर खर्चासाठी पैसेच शिल्लक नाहीत. दहा दिवसांपासून मोबाईल इंटरनेटचं रिचार्ज संपलंय, ते रिचार्ज केले नाही. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण कसं घ्यायचं?
शाळेत हुशार असणारी विद्यार्थिनी श्वेता हिने सांगितले, की ‘‘सर, लॉकडाउनमुळे आईवडील घरात बसून आहेत. कामधंदाच नसल्यामुळे घरात पैसा नाही. त्यामुळे दररोजच्या जेवणासाठी सामाजिक काम करणाऱ्या लोकांची वाट पाहत बसावं लागत आहे. कोणी चपाती, कोणी तांदूळ देतं... यासाठी आईसोबत रस्त्याच्या कडेला जाऊन बसतं असतो. त्यामुळं कुठं ऑनलाइन शिक्षण घ्यायला वेळ मिळतोय? सध्या आम्हाला शिक्षणाची नाही तर दररोजच्या जेवणाची चिंता आहे. हे ऐकून मन व्यथित झाले. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही तातडीने निर्णय घेत १८ क्विंटल गहू, तांदूळ, डाळ तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला एक साबण असे शाळेच्या एकूण ९०० विद्यार्थ्यांना वितरित केले.
...अन् त्यांचे चेहरे खुलले
मुकुंदवाडी, राजनगर हा रेल्वेपटरीच्या पलीकडे नव्याने वसलेला परिसर आहे. या ठिकाणी सर्व मोलमजुरी, हातावर पोट असणारे गरीब, कामगार वर्गातील लोक राहतात. याठिकाणी गणपतराव जगताप प्राथमिक, माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेत शिकणारे बहुतांश मुलं ही कामगार वर्गातील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे लॉकडाउनचे नियम पाळत अन्नधान्य वितरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.